स्क्रिप्टेड सीनची शंका आणि हॅलो धाराशिवचे आठ सवाल
धाराशिव – फॉर्च्यूनर गाडीतून मिरवणं, आजूबाजूला बाऊन्सरांचा गराडा, आणि जाईल तिथं फोटो काढण्यासाठी तरुणांची झुंबड… हे वाचून तुम्हाला वाटेल की आम्ही एखाद्या राजकीय नेत्याबद्दल बोलतोय. पण थोडा थांबा! आम्ही बोलतोय ते एका सर्वसामान्य कुटुंबातून समाजमाध्यमांवरून पुढे आलेल्या हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्याबद्दल.
“आज वार रविवार, सकाळी चार कापलेत, रात्री आठचा बेत हाय, येयलाच लागतंय!” असा दमदार डायलॉग आणि मटणप्रेमींना भुरळ घालणाऱ्या रील्समुळे राज्यभरात ओळख निर्माण करणारे आणि आपल्या मुलीच्या वाढदिवसाला नव्या कोऱ्या फॉर्च्यूनरची खरेदी केल्याने नागेश मडके हे चर्चेत आले. परंतु, हे यश शिगेला जात असतानाच मडके पुन्हा चर्चेत आले — यावेळी कारण वेगळं आणि गंभीर होतं.
२३ जुलै अपहरणाचा थरार!
नागेश मडके यांचं म्हणणं आहे की, २३ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ५ अनोळखी युवकांनी त्यांच्या हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर, फोटो काढण्याच्या बहाण्याने त्यांना गाडीजवळ बोलावलं. मडके यांनी गाडीत डोकावताच गाडीची काच बंद करत १४० किमी प्रतितास वेगाने चालणाऱ्या गाडीत फरफटत नेत मारहाण करत वडगाव पुलावर फेकण्यात आलं. सदर, घटनेनंतर मडके थेट जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले. यावेळी, माध्यमांनी गर्दी केली. मडके यांनी पहिल्याच प्रतिक्रियेत सांगितलं की, “मी अपहरण करणाऱ्यांपैकी कोणालाही ओळखत नाही, पण मला बळजबरीने मारहाण झाली.” आणि मला संरक्षण द्या…
घटनेच्या तिसऱ्या दिवशी NDTV मराठीला दिलेल्या मुलाखतीत बदललेलं कथन
एनडीटीव्ही मराठीचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांच्याशी बोलताना मडके यांनी पहिल्यांदा केलेल्या दाव्याच्या व्यतिरिक्त काही वेगळे दावे केले. “माझ्या तोंडावर बुक्का मारल्या, माझ्या डोक्याला बंदूक लावली. एक तोळ्याची साखळी सुद्धा घेऊन गेले. आणि हो… मी त्यांना ओळखतो. माझ्याकडे सीसीटीव्ही आहे.”
परंतु… या दोन्ही प्रतिक्रियांमध्ये स्पष्ट तफावत दिसते.
१) ओळखतात की नाही?
पहिल्या प्रतिक्रियेत मडके यांनी आपण अपहरण करणाऱ्यांना “ओळखत नाही” म्हटले, नंतर “मी त्यांना ओळखतो” असे स्पष्टपणे सांगितले.
२) बंदुकीचा उल्लेख?
सुरुवातीला बंदुकीचा उल्लेख नाही,
मात्र नंतर “मागून बंदूक लावली” असे स्पष्ट केले.
३) सोन्याची साखळी चोरी?
सुरुवातीला कुठलाही उल्लेख नाही,
नंतर “४० हजाराची सोन्याची साखळी नेली” असं सांगितलं.
धमकीचा कॉल की उलटी धमकी?
मडके यांनी दावा केला की, १५ दिवसांपूर्वी त्यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी आली होती. मात्र, त्या कॉलचे रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर वेगळंच चित्र दिसलं.
धमकी देणारा व्यक्ती भीतीने बोलतोय, तर मडके यांचा सुर चढत चाललेला. “माझी सुपारी कुणी दिली? मी व्हिडीओ टाकणारचं” अशी वक्तव्ये करत ते उलट त्या व्यक्तीला उचकवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
पोलिसांचा संशय, पिस्तुलासाठी बनाव?
नागेश मडके यांना पिस्तुल परवाना मिळावा यासाठीच हा सर्व बनाव रचण्यात आला असावा, असा पोलिसांना संशय होता.
मडके यांनीसुद्धा एका मुलाखतीत कबूल केलं की, “इतकी मोठी घटना झाल्यानंतरही पोलिस माझ्यावरच पिस्तूल परवाना मिळवण्यासाठी बनाव केल्याचा आरोप करत आहेत.”
मात्र, सोशल मीडियावर काही नेते मंडळींनी गुन्हा नोंदवला जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि अखेर धाराशिव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या सर्व प्रकरणावर उपस्थित होणारे प्रश्न
१) खरंच अपहरण घडलं का?
हॉटेलसमोर गर्दी, बाऊन्सर्स, सीसीटीव्ही आणि ग्राहकांच्या उपस्थितीत हे अपहरण कसं घडलं?
२) फुटेज अधूरं का?
मडके यांनी आरोपींचं हॉटेलमध्ये येतानाचं सीसीटीव्ही फुटेज दिलं. आरोपी बाहेर जाताना का दिसत नाहीत? संपूर्ण फुटेज का नाही?
३) १४० किमीचा वेग, तरीही गंभीर जखमा नाहीत? फरफटत नेल्याचा दावा, पण शरिरावर गंभीर जखमा कुठं?
४) स्टाफ, ग्राहक, बाऊन्सर्स, साक्षीदार का नाहीत? ५ जणांनी उचलून नेलं तरी कोणी काहीच पाहिलं नाही?
५) हॉटेलमध्ये लाईट गेली होती, तरी अंधारात फोटोसाठी का गेले?
६) पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा का नाकारला?
पोलिसांना हे प्रकरण बंदुकीच्या परवान्यासाठीचा बनाव वाटत होतं, हे महत्त्वाचं आहे.
७) प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्टंट तर नाही ना?
मडके यांची सोशल मीडिया उपस्थिती लक्षात घेता, ही सगळी स्क्रिप्ट असू शकते का?
८) आत्मदहनाचा इशारा, सहानुभूतीचा भाग? हे वक्तव्य सहानुभूती मिळवण्यासाठी होतं की दबाव टाकण्यासाठी?
तपास सुरू आहे… पण सत्य काय?
हे सगळं पाहता नागेश मडके यांच्या कथनावर प्रश्नचिन्हं निर्माण झाली आहेत.मात्र, धाराशिव पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत आणि लवकरच सत्य समोर येईल, अशी अपेक्षा आहे.












