धाराशिव : पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी आज निकाल लागण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे पुत्र ओमराजे निंबाळकर यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. “20 वर्षे 13 दिवस संघर्षाची, अपेक्षा न्यायाची” अशा शब्दांत सुरू होणाऱ्या पोस्टमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी वडील पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या हत्येनंतर दोन्ही कुटुंबांनी गेल्या दोन दशकांपासून न्यायासाठी संघर्ष केल्याचे नमूद केले आहे.
पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “आज न्यायदेवता न्याय करणार आणि ज्यांनी रक्ताच्या नात्याला काळीमा फासला, त्यांचा फैसला होणार ही अपेक्षा आहे.” तसेच हा खटला केवळ एका हत्येचा नसून सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर सामान्य लोकांना गुलाम समजणाऱ्या मानसिकतेविरुद्धचा संघर्ष असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
“आजपर्यंत अनेक परीक्षा दिल्या, पण कोणत्याच निकालासाठी एवढा वेळ लागला नाही. आजच्या निकालाकडे दोन्ही कुटुंबीय न्यायाच्या अपेक्षेने पाहत आहेत,” असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. पोस्टच्या शेवटी ओमराजे निंबाळकर यांनी “राजेसाहेब आणि समद काझी यांच्या खुन्यांना कठोर शिक्षा व्हावी, एवढीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना आहे,” अशी भावना व्यक्त केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाच्या निकालाकडे राज्यातील राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे.








