धाराशिव : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेवक संतोष उर्फ नाना घाटगे यांच्यासह चार नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चेला पूर्णविराम देत मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, या पक्षप्रवेशानंतर धाराशिवच्या राजकारणात नवाच ‘बॅनर वॉर’ सुरू झाल्याचे चित्र आहे.पक्षप्रवेशाची चर्चा संपते न संपते तोच समता कॉलनी परिसरात झळकलेल्या एका आक्रमक बॅनरने राजकीय वातावरण ढवळून काढले आहे.
विशेष म्हणजे, या बॅनरमधून थेट नगरसेवकाचे नाव न घेता अत्यंत बोचऱ्या शब्दांत पक्षबदलावर निशाणा साधण्यात आला आहे.‘एक कोटीचा गद्दार, हा शिक्का पुसला जाणार नाही’, ‘एक खोका, मतदाराला दिला धोका’, ‘प्रभाग क्रमांक ९ चे उबाठा नगरसेवक, आमचे मत आम्हाला परत द्या’ अशा घोषणांनी बॅनरची चर्चा रंगली आहे. त्याचबरोबर ‘निष्ठा विकली’, ‘सोसायटी लुटली, तिजोरी फोडली’ असे गंभीर आरोपही बॅनरवर करण्यात आल्याचे दिसत आहे.या आरोपांमुळे पक्षांतराच्या राजकारणाला आता आर्थिक व्यवहारांच्या चर्चेचीही किनार मिळाली आहे. मात्र, बॅनरवर करण्यात आलेल्या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नसून, संबंधितांकडून या आरोपांवर अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही.
समता कॉलनीतच बॅनरची सर्वाधिक चर्चाप्रभाग क्रमांक ९ अर्थात समता कॉलनी हा सुशिक्षित, व्यावसायिक आणि जागरूक मतदारांचा परिसर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे याच परिसरात पक्षप्रवेशानंतर अवघ्या काही तासांत अशा स्वरूपाचा बॅनर झळकल्याने राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.निवडणुकीत मतदारांनी ज्या उमेदवारावर विश्वास ठेवून प्रतिनिधित्वाची संधी दिली, त्याच प्रतिनिधीने निवडणुकीनंतर पक्ष बदलल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे का? की या बॅनरमागे स्थानिक राजकारणातील एखादा मोठा राजकीय संदेश दडला आहे? याची चर्चा आता सुरू झाली आहे.
पक्षबदल की राजकीय खेळी?
नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच बॅनरबाजीने या घडामोडीला आणखी धार दिली आहे. पक्षांतर नेमके कोणत्या कारणामुळे झाले, त्यामागे कोणाची भूमिका होती आणि या संपूर्ण घडामोडीचा आगामी स्थानिक राजकारणावर काय परिणाम होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.एकीकडे शिंदे गटाकडून नगरसेवकांच्या प्रवेशाचे राजकीय बळ म्हणून सादरीकरण होत असताना दुसरीकडे विरोधकांकडून थेट मतदारांच्या विश्वासाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
त्यामुळे प्रभाग क्रमांक ९ मधील ही घटना केवळ पक्षबदलापुरती मर्यादित न राहता धाराशिवच्या स्थानिक राजकारणातील आगामी संघर्षाची नांदी ठरणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.दरम्यान, ‘एक कोटीचा गद्दार’ आणि ‘निष्ठा विकली’ या घोषणांमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या बॅनरमागे नेमके कोण आहे आणि त्यातून कोणाला राजकीय इशारा देण्यात आला आहे, याची उत्सुकता आता वाढली आहे.






