धाराशिव : भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदावरील बदलामुळे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात आधीच चर्चेला उधाण आले असताना आता नव्या नियुक्तीभोवती आणखी एक मुद्दा चर्चेत आला आहे. राहुल काकडे यांना भाजयुमो जिल्हाध्यक्षपदावरून हटवून त्यांच्या जागी गणेश इंगळगी यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र नव्या जिल्हाध्यक्षांचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याची माहिती असतानाच गणेश इंगळगी यांचे वडील हे काँग्रेसने आयोजित केलेल्या आंदोलनातही उपस्थित असल्याची चर्चा समोर आली आहे. त्यामुळे भाजपच्या या नव्या नियुक्तीवरून राजकीय वर्तुळात मिश्कील सवाल उपस्थित होत आहेत.

अवघ्या सहा महिन्यांपूर्वी राहुल काकडे यांची भाजयुमो जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांच्याकडून पद काढून घेण्यात आल्याने या निर्णयामागील नेमके कारण काय, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. काकडे हे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. दुसरीकडे त्यांच्या जागी राणाजगजीतसिंह पाटील यांचा धाकटा मुलगा म्हणजेच मेघ पाटील यांच्यासोबत तेरणा युथ फाऊंडेशन मध्ये पदाधिकारी असलेल्या गणेश इंगळगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पण आता या नियुक्तीतील आणखी एक योगायोग राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे. गणेश इंगळगी यांचे वडील काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याची माहिती आहे. एवढेच नव्हे तर गणेश इंगळगी यांचे वडील हे काँग्रेसने केलेल्या आंदोलनात उपस्थित असल्याची माहिती/छायाचित्रेही समोर आल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मिश्कीलपणे प्रश्न विचारला जात आहे—“बोंबला! भाजयुमोचा जिल्हाध्यक्ष भाजपचा, पण वडील काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या आंदोलनात उपस्थित?” अर्थात, एखाद्या आंदोलनात उपस्थित राहणे म्हणजे संबंधित व्यक्ती काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, असा थेट निष्कर्ष काढता येत नाही. मात्र भाजपच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या पूर्वीच्या राजकीय उपस्थितीवरून प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचे राजकीय कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, राहुल काकडे यांनी मात्र आपण वैयक्तिक कारणामुळे पद सोडल्याचे स्पष्ट केले असून पक्षाने दिलेला आदेश मान्य असल्याचे सांगितले आहे. तर गणेश इंगळगी यांनी पक्षाने नवख्या कार्यकर्त्याला संधी दिल्याबद्दल पक्षाचे आभार मानले आहेत.
त्यामुळे एका बाजूला राहुल काकडे यांच्या पदबदलावरून “हकालपट्टी की राजीनामा?” असा सवाल, दुसऱ्या बाजूला नव्या जिल्हाध्यक्षांच्या राजकीय पार्श्वभूमीवरून “भाजपमध्ये नेमकी कसली नवी राजकीय समीकरणे तयार होत आहेत?” अशी चर्चा आणि त्यात काँग्रेसच्या आंदोलनातील उपस्थितीची भर—यामुळे भाजयुमोच्या या नियुक्तीने धाराशिवच्या भाजपच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडवली आहे.









