कायदा, न्याय आणि संविधानाची सांगड; धाराशिवमध्ये ॲड. असीम सरोदे यांचे विशेष व्याख्यान
धाराशिव, दि. १० ऑक्टोबर २०२६ :
कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कायदेशीरता, न्यायाची संकल्पना, संविधानिक मूल्ये आणि नागरिकांच्या हक्कांविषयी व्यापक समज निर्माण व्हावी, या उद्देशाने डॉ. बापूजी साळुंखे लॉ कॉलेज, धाराशिव येथे संविधान विश्लेषक व नागरीहक्क भाष्यकार ॲड. असीम सुहास सरोदे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दि. १० ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष व्याख्यानाचा विषय ‘न्याय-अन्याय व संविधान’ असा आहे. कायद्याचा केवळ तांत्रिक अभ्यास न करता कायदा, न्याय, संविधान आणि मानवी हक्क यांचा परस्परसंबंध समजून घेण्याच्या दृष्टीने हे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘हक्कांच्या खिडक्या व कायदेशीरता’ या विषयावर चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात ॲड. श्रीया आवले, ॲड. आर्या राजेभोसले, ॲड. प्रेरणा बनसोडे आणि ॲड. दीपाली धिवरे सहभागी होणार आहेत.
कायद्याच्या विद्यार्थ्यांनी न्यायव्यवस्था, संविधानिक अधिकार, कायदेशीर प्रक्रिया आणि सामाजिक वास्तव यांचा चिकित्सक दृष्टिकोनातून विचार करावा, तसेच कायद्याच्या माध्यमातून न्याय आणि संविधानिक मूल्यांच्या संवर्धनाची भूमिका समजून घ्यावी, या व्यापक उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थी, कायद्याचे अभ्यासक आणि युवा वकील यांच्यासाठी हे व्याख्यान व चर्चासत्र कायदेविषयक दृष्टिकोन संवर्धन करणारा उपक्रम ठरणार आहे.






