धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा येथे पवनचक्कीच्या वाहनाने दुचाकीला चिरडल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात दुचाकीवर प्रवास करणारे वसंत जगताप आणि चांद शेख (दोघेही राहणार कडकनाथवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर संबंधित पवनचक्कीचे वाहन घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना कडकनाथवाडी येथील ग्रामस्थांनी तत्परता दाखवत वाहन अडवले.
उल्लेखनीय बाब म्हणजे, मागील महिन्यात देखील याच परिसरात एका शेतकऱ्याचा पवनचक्कीच्या वाहनाखाली चिरडून मृत्यू झाला होता. सलग घडणाऱ्या अशा घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.










