धाराशिव : धाराशिव ते बोरफळ या महत्त्वाच्या मार्गावरील रखडलेल्या आणि अत्यंत निष्काळजीपणे सुरू असलेल्या कामामुळे एका निष्पाप तरुणाचा बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि ठेकेदाराची बेफिकिरी आता थेट जीवघेणी ठरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
भंडारवाडी येथील रहिवासी ओम दिलीप अंधारे (वय अंदाजे २० ते २५) हा तरुण दररोजप्रमाणे धाराशिव शहरातील काम आटोपून आपल्या गावी परतत असताना हा भीषण अपघात घडला. संध्याकाळी सुमारे ९ ते ९.१५ वाजण्याच्या सुमारास सांजा गावाजवळ सुरू असलेल्या पुलाच्या कामाच्या ठिकाणी ही दुर्घटना झाली.
ओम अंधारे हा यामाहा कंपनीच्या MH 25 AU 6914 क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत होता. मात्र, ज्या ठिकाणी पुलाचे काम सुरू आहे, त्या ठिकाणी कोणतेही सुरक्षा कठडे, सूचना फलक, रेडियम मार्किंग किंवा इशारे लावलेले नव्हते. परिणामी, अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याची दुचाकी थेट पुलासाठी खोदलेल्या खोल खड्ड्यात जाऊन आदळली. या भीषण धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना केवळ अपघात नसून ठेकेदाराच्या निष्काळजीपणातून घडलेला “मनुष्यवध” असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, 2 दिवसापूर्वी याच ठिकाणी चार चाकी गाडीचा देखील अपघाता येऊन अनेकजण गंभीर जखमी झाले होतें ही घटना ताजी असताना देखील या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून कोणतेही फलक लावण्यात लाव नाहीत.
ओम अंधारे हा आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती. त्याच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली असून संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे.
विशेष म्हणजे, धाराशिव शहरातील जिजाऊ चौक ते बोरफळ हा रस्ता अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, सुरक्षा उपाययोजना पूर्णपणे धाब्यावर बसवल्या गेल्या आहेत. या मार्गावर वारंवार अपघात होत असतानाही प्रशासन आणि ठेकेदार पूर्णपणे निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सध्या संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, ठेकेदारावर तात्काळ कठोर कारवाई, गुन्हा दाखल करणे आणि अपूर्ण काम त्वरित सुरक्षित पद्धतीने पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.











