धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) – धाराशिव शहरातील गल्लोगल्ली अवैध धंद्याचे पेव फुटून ऊत आला आहे.
या अवैध धंद्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन देशोधडीला लागले व लागत आहेत. त्यामुळे या धंद्याला आळा घालण्यासाठी दि.१८ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास भवानी चौक ते अहिल्यादेवी होळकर चौक दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – ५२ लगत असलेल्या गाझी हॉटेल शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये…अंधेरी रातो में, सुनसान पत्रों के शेड की आसरा में… तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईमध्ये १० लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा भाग धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत आहे. मात्र, धाराशिव शहर पोलिसांचे या अवैध धंद्याकडे सोयीस्कररित्या अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला त्या ठिकाणी धडक कारवाई करण्याची वेळ ओढवली. जर ही कारवाई शहर पोलीस ठाण्याच्या प्रमुखांनी केली असती तर या परिसरात विशेषतः शहरात अवैध धंदे बोकाळले नसते.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.१८ ऑगस्ट रोजी रात्री ८.२० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक – ५२ लगत असलेल्या गाझी हॉटेल लगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये काहीजण वर्तुळ करून तिरंट नावाचा जुगार खेळत असल्याची खत्रीशीर व गोपनीय माहिती मिळाली. ती माहिती मिळताक्षणीच अप्पर पोलीस अधीक्षक शफाकत आमना यांच्या स्वतंत्र पथकाने सापळा रचून धाड टाकली. या धाडीमध्ये सर्फराज मक्सुद कुरेशी, जुबेर जमील शेख, श्रीकांत बाबासाहेब शिंदे, पाशा कमाल पटेल, अजमतुल्ला जब्बार शेख, अमोल प्रकाश देढे, अलिम करम सय्यद, सागर मारुती भांडवले, आबेद अब्दुल करीम शेख आणि रविंद्र मैंदाड (सर्व रा. धाराशिव) यांना खेळत असताना रंग हात पकडून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्या ठिकाणाहून पत्त्यांचे संच, रोख रक्कम, विविध मोबाईल फोन्स, एटीएम कार्डे, पाच दुचाकी आणि एक कार असा मोठा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. विशेष म्हणजे रविंद्र मैंदाड याच्याकडून ६ लाख ५८ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल मिळाला असून यात मारुती सुझुकी इर्टिगा (एमएच – २५ एएस – ६८८६) कारचाही समावेश आहे. तर इतरांकडून होंडा शाईन (एम एच – २५ एक यू- ६४८५), जिक्सर (एमएच – २५ एई – ७६६०), एचएफ डिलक्स (एमएच – १२ एनटी – १२६८), स्लेंडर प्लस (एमएच -१३ एडी – ४४५३) असा दुचाकी तसेच सॅमसंग, रेडमी, विवो, ओप्पो, ऍपल आदी कंपन्यांचे मोबाईल व विविध मूल्यांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयातील वाचक शाखेचे पोहेकॉ स्वप्नदिप उद्वराव भोजगुडे यांच्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ३९६/२०२५ भादंविसह थेट महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४, ५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर दहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. ही दमदार कामगिरी प्रभारी पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली वाचक शाखेचे सपोनि हिंगोले यांच्या विशेष पथकाने केली आहे. पुढील तपास पोना क्षिरसागर करीत आहेत.











