धाराशिव: धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तुळजापूर महोत्सवात गार डोंगराची हवा न बाईला सोसना गारवा या गाण्यावर डान्स केला होता. एकीकडे धाराशिव जिल्ह्यावर पुराचे सावट असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केलेला डान्स हा चर्चेचा विषय बनला होता. धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, तथा धाराशिव – कळंबमतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी कीर्ती किरण पुजार यांच्यावर सडकून टीका केली होती. याचबरोबर, शेतकऱ्यांसह , वासिवासियांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांवर टीकेची झोड उठवली होती. दरम्यान, एक पत्र काढत जिल्हाधिकाऱ्यांनी झालेल्या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त केली आहे.
नेमकं पत्रात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी काय म्हटलं?
महोत्सवातील परंपरा व जबाबदारी लक्षात घेऊन अल्प वेळासाठी मंचावर गेलो असता कलाकारांनी आग्रहाने त्यांना उपस्थितांचे स्वागत करण्यासाठी बोलावले.“त्या क्षणी जिल्हाधिकारी म्हणूनच नव्हे,तर एक भाविक भक्त म्हणून देवीच्या स्तवनात सहभागी झालो. जर या कृतीमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून दिलगीरी व्यक्त करतो,” असे जिल्हाधिकारी पुजार यांनी म्हटले आहे.
जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांच्या वर्तनावर काय म्हणाले ओमराजे निंबाळकर?
हे अतिशय असंवेदनशीलतेच लक्ष नाही. याची निषेध करावा तेवढा कमी आहे. असं निंबाळकर यांनी म्हटलं आहे. आज आपण पाहिलं असेल धाराशिव आणि त्याच्या शेजारी जिल्ह्यामध्ये भयंकर पाऊस झाला आहे. पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. गेल्या शंभर वर्षापासून अशा पद्धतीने पावसामुळे नुकसान कधीच झालं नव्हतं. शेतकऱ्याची जमीन, पीक सर्वच वाहून गेल आहे. शेतकऱ्याच्या घरात चिखल झाला आहे. त्याची सध्याची परिस्थिती अतिशय प्रतिकूल आहे. शेतकरी अतिशय चिंतेत आहे. शिक्षणासाठी, शेतीसाठी घेतलेलं कर्ज फेडायचं कसं याच्या चिंतेत तो आहे. अशा स्थितीमध्ये भूम तालुक्यातील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. अशा परिस्थितीत त्याच्याकडे अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांकडे संवेदनशीलतेने बघणे गरजेचे आहे. आपण त्याला आधार देणे गरजेचे आहे. मात्र अशा पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांचे वर्तन हे अतिशय दुर्दैवी निषेधार्ह आहे. हे वर्तन आपल्याकडून होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे.










