गेल्या दोन दिवसांपासून धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी तुळजाभवानी फेस्टिवलमध्ये केलेल्या डान्सनंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली. जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील तसेच शेतकरी, नागरिकांकडून जिल्हाधिकारी यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. याचबरोबर, जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. असं असताना देखील जिल्हाधिकाऱ्यांनी फेस्टिवल मध्ये नाचणं कितपत उचित होतं? असा सवाल देखील उपस्थित केला जाऊ लागला आहे? यातच जिल्ह्यातील निवृत्त पत्रकार तानाजी जाधवर यांनी त्यांच्या फेसबुकवर केलेली पोस्ट आता चर्चेचा विषय बनला आहे. तानाजी जाधवर यांनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट करत गंभीर आरोप केला आहे.
नेमकं काय म्हणाले निवृत्त पत्रकार तानाजी जाधवर?
स्वतःच्या दावणीला बांधलेली एक पीआर एजन्सी एका सत्ताधारी नेत्याने धाराशिव जिल्हाधिकारी यांना मंदीर व त्यांच्या प्रसिद्धीसाठी नेमायला लावली. त्याच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्या प्रत्येक कार्यक्रम व हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्याचा यामागचा हेतू होता.
सांस्कृतीक कार्यक्रमाचा व्हिडिओ त्यांनी पद्धतशीरपणे प्रसार माध्यमात पोहचवला, त्याची चर्चा घडवून आणली. त्यानंतर एक पोस्ट करून जिल्हाधिकारी यांच्यावर टीका करीत संताप व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अन्य मंत्री दौरे करीत असताना जिल्हाधिकारी यांचा व्हिडिओ आला असे म्हणत पोस्ट केल्या, तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून प्रतिक्रिया कळवा असे सांगितले, विषय चर्चेत आला की पद्धतशीरपणे ती पोस्ट डिलीट केली. मी नाही त्यातला असे म्हणत त्याच पीआर संस्थेने जिल्हाधिकारी यांच्या बाजुने वाजवायला सुरुवात केली.
स्वतःच्या पक्षाची यंत्रणा वापरून जिल्हाधिकारी यांच्या समर्थनात पोस्ट करून लोक तुमच्या पाठीशी आहेत हे आभासी दाखवण्याचा डाव खेळला व जिल्हाधिकारी यांच्या डोक्यावर हात ठेवला. अडचणीत आणायचे व पुन्हा सोडवायचे असा हा प्रकार पोस्ट डिलिट केल्याने समोर आला आहे. नेत्याच्या या आदेशाने जिल्हाधिकारी मात्र अडचणीत आले.
1 कोटींचा मुख्यमंत्री सहायता निधी देऊन हे प्रकरण शांत होण्याची शक्यता दिसत नाही. त्याचा याचा संबंध नसतो. असं तानाजी जाधवर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.










