महत्त्वाची आढावा बैठक आज उत्साहात पार पडली. आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत पक्षाच्या रणनीतीसंदर्भात दोन महत्त्वाचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले आहेत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते प्रतापसिंह पाटील यांनी दिली आहे.
बैठकीत ठरविण्यात आले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीच्या घटकपक्ष म्हणूनच आगामी निवडणूक लढवणार आहे. तसेच, नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीकडूनच उमेदवारी देण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे करण्यात येणार असल्याचा ठरावही बैठकीत मंजूर करण्यात आला. बैठकीदरम्यान पक्षातील कार्यकर्त्यांनी धाराशिव नगरपालिकेतील जनतेचा विश्वास आणि पक्षाची ताकद लक्षात घेता, राष्ट्रवादी काँग्रेसकडे नगराध्यक्ष पदाचा प्रबळ दावेदार असल्याचे मत व्यक्त केले. पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले की, “महाविकास आघाडीच्या एकतेतूनच धाराशिवच्या विकासाचा मार्ग निघेल. जनता आमच्यासोबत आहे आणि राष्ट्रवादीचा झेंडा पुन्हा एकदा नगरभवनावर फडकणार आहे”
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे नेते प्रतापसिंह पाटील यांनी माध्यमांना बोलताना म्हटलं, की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची ताकद या जिल्ह्यात आणि शहरात कायम आहे. लोकसभेत आणि विधानसभेत या शहराने कायम आघाडी दिली आहे. आज झालेल्या बैठकीत दोन ठराव अतिशय महत्त्वाचे पार पडले. महायुतीच्या विरोधात मोठ्या प्रमाणात वातावरण आहे. शेतकऱ्यांचे, मतचोरी असे अनेक मुद्दे असल्याचं पाटील यांनी म्हटलं.
महाविकासआघाडी म्हणून आम्ही या निवडणुकीत सामोरे जाणार आहोत. आमच्याकडे नगराध्यक्ष पदाकरता प्रबळ दावेदार आहेत. आम्ही हे पक्षश्रेष्ठीला लवकरात लवकर कळवणार आहोत. असं प्रतापसिंह पाटील यांनी म्हटलं आहे.या बैठकीला , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जीवनराव गोरे, बाबा मुजावर, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.











