हॅलो धाराशिव | Hello Dharashiv – Desk
धाराशिव जिल्ह्यातील वीज समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून ठोस पावले उचलण्यात येत आहेत. मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशानुसार, आणि आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नवीन उपकेंद्र उभारणी व विद्यमान केंद्रांचे श्रेणीवर्धन करण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले असल्याचं भाजपचे प्रवक्ते नितीन भोसले यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, या योजनेसाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून तसेच आशियाई विकास बँकेकडून (ADB) मोठा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विजेच्या पायाभूत सुविधांमध्ये ऐतिहासिक बदल होणार असल्याचंही भोसले म्हणाले.
मात्र, हा प्रस्ताव मंजूर होणार हे लक्षात येताच, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या प्रकल्पाचे श्रेय स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रत्यक्षात सहा वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यासाठी एक रुपयाचाही निधी आणण्यात त्यांना अपयश आले. त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री सत्तेवर असतानाही धाराशिव जिल्ह्यासाठी काही ठोस कामगिरी नोंदवता आली नाही. आता मात्र, राज्य सरकार आणि आमदार राणा दादा यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील वीजपुरवठा सुधारण्यासाठी होणाऱ्या कामांचे श्रेय घेण्यासाठी निंबाळकर यांची धडपड सुरू आहे. असा आरोप नितीन भोसले यांनी जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर केला.
जनतेच्या हितासाठी सुरू असलेल्या उपक्रमांवर “माझ्या प्रयत्नांमुळे झालं” असं सांगत स्वतःला केंद्रस्थानी ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न लोकांच्या लक्षात येत आहे. आणि जेव्हा काम थांबतं किंवा विलंब होतं, तेव्हा “सरकारमुळे झालं नाही” असा ठरलेला पवित्रा घेऊन जबाबदारी झटकण्याची पद्धत सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि राजकीय वर्तुळांमध्ये आता चर्चा सुरू आहे की, काम करणारे शांतपणे काम करतात, आणि फक्त नाव कमावणारे जाहिराती करतात. जनतेला हवे आहेत काम करणारे नेते केवळ सोशल मीडियावर पोस्ट करून श्रेय घेणारे नव्हे. असं नितीन भोसले यांनी म्हटलं.
धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आमदार राणा दादा यांच्या कामगिरीमुळे आज अनेक प्रलंबित प्रकल्प गतीमान झाले आहेत. आणि या पार्श्वभूमीवर दुसऱ्याच्या मेहनतीचं श्रेय घेण्याचा राजकीय प्रकार जिल्ह्याच्या जनतेला लाजिरवाणा आणि हास्यास्पद वाटत आहे. “बंद करा असली अर्धवट माहिती आधारे चालवलेली नौटंकी!” — असं म्हणत नागरिकांनी आता थेट प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. काम झालं की “माझ्या प्रयत्नांमुळे झालं”, आणि नाही झालं की “सरकारमुळे झालं नाही”वारे खासदार… दरम्यान, खासदार यांनी सहा वर्षात १ रुपयाही निधी आणला नाही. त्यांचे नेते राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा जिल्ह्यासाठी कामगिरी शून्य आणि दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय घ्यायला मात्र सर्वात पुढे. असं भोसले म्हणाले..











