धाराशिव
धाराशिव शहरात गणेशोत्सवावेळी महाविकासआघाडी आणि भाजप समोरासमोर आल्याचे आले होते. यावेळी, दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाल्याचं पाहायला मिळालं. शिस्तबद्ध गणेश विसर्जन स्पर्धेसाठी आयोजित केलेल्या बक्षिसांची रक्कम देखील वाढवण्यात येत होती. महाविकासआघाडीने बक्षिसांची रक्कम 55 हजार ठेवली होती. तर, भाजपने शिस्तबद्ध गणपती विसर्जनाची बक्षिसाची रक्कम 71 हजार ठेवली होती. मात्र, महाविकास आघाडी आणि भाजपचे मंडप समोरासमोर असल्याने बक्षिसांच्या रकमा वाढवण्यासाठी चढाओढ निर्माण झाली. भाजपने 71 हजार रुपयांच्या बक्षीसाची रक्कम 1 लाख 11 हजार रुपयांपर्यंत नेली. तर, महाविकासआघाडीकडून एक छदाम देखील वाढवण्यात आला नाही. त्यामुळे, बक्षिसांची रक्कम वाढवण्यात महाविकासआघाडीचा पराभव झाला असल्याच्या चर्चा गणेश भक्तांमध्ये सुरू होत्या.
महाविकासआघाडीच्या स्टेजवर शांतता, भाजपच्या स्टेजवर जल्लोष
गणेशोत्सव मिरवणुकीच्या दरम्यान जिल्ह्यातील सर्वच प्रमुख नेते आमने-सामने आले होते. शहरातील काळा मारुती परिसरात भाजप आणि महाविकास आघाडीचे स्टेज आमने-सामने होते. भाजपच्या स्टेजवर मल्हार पाटील यांच्यासह अमित शिंदे, नितीन काळे, नितीन शेरखाने, अक्षय ढोबळे, अभिजीत पतंगे यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते होते. तर, महाविकास आघाडीच्या स्टेजवर खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते होते. गणपतीची मिरवणूक आल्यास दोन्ही बाजूकडून घोषणाबाजी होत होती. मल्हार पाटील यांचे कार्यकर्ते दंड थोपटून गाण्याच्या तालावर ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्याकडे बघत “कितीबी समोर येऊ द्या त्यांना एकटा बास” अशी गाणी लावून जल्लोष करत होती. बक्षीसांची रक्कम वाढवली जात होती. 71 हजार रुपयांवरून 1 लाख 11 हजार रुपये बक्षीस मल्हार पाटलांनी वाढवले. मात्र, महाविकासआघाडीकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नव्हता. स्टेजवर फक्त घोषणाबाजी होत होती. बक्षीसांची रक्कम वाढवली गेली नाही किंवा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला नाही.
गणेश मंडळांकडून राणाजगजितसिंह पाटील यांचे कौतुक
मराठा आरक्षणाच्या काळात मुंबईमध्ये मराठा समाजाचे प्रचंड हाल झाले होते. यावेळी, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुंबईत आपल्याला थारा दिला. राहण्याची, खाण्याची व्यवस्था केली. असं म्हणत गणेश मंडळांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे कौतुक केले. मात्र, काही नेते असे आहेत की त्यांनी साधी फेसबुक वर पोस्ट देखील केली नाही असं म्हणत खासदार निंबाळकरांवर खंत देखील व्यक्त केली.










