धाराशिव : धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मोठा दावा करत विरोधकांवर गंभीर आरोप केला आहे. काही राजकीय लोकांनी एक सोशल मीडिया टीम बनवून माझ्या व्हाट्सअप अकाउंटवर जाणीवपूर्वक रिपोर्ट मारण्यात येत आहेत, ज्यामुळे माझे अकाउंट ब्लॉक व्हावे, असा कट रचला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
खासदार निंबाळकर म्हणाले, “हा प्रयत्न मला सर्वसामान्य लोकांच्या संपर्कापासून दूर ठेवण्यासाठी केला जात आहे. हा अतिशय नीच प्रयत्न आहे. यासंदर्भात मी व्हाट्सअप कंपनीला कळवले असून, सायबर पोलिसांकडेही तक्रार केली आहे.”
“व्हाट्सअपच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांची कामे होतात”
माध्यमांशी बोलताना ओमराजे निंबाळकर म्हणाले की, शेतकरी, विद्यार्थी व कार्यकर्ते यांच्या विविध कामांसाठी ते व्हाट्सअपचा वापर करतात. “सर्वसामान्य लोक थेट माझ्याशी व्हाट्सअपवर संपर्क साधतात. आलेल्या समस्या किंवा अडचणी मी व्हाट्सअपद्वारेच संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून जाणीवपूर्वक माझ्या अकाउंटवर रिपोर्ट करून मला थांबवण्याचा प्रयत्न होत आहे,” असा दावा त्यांनी केला.
विरोधकांवर सडकून टीका
नाव न घेता विरोधकांवर टीका करताना खासदार म्हणाले, “माझे विरोधक सोशल मीडियावर वेगवेगळ्या खोट्या पोस्ट तयार करतात. रोज सकाळी कार्यकर्त्यांच्या मीटिंगमध्ये पैसे देऊन माझ्या विरोधात पोस्ट टाकायला लावतात. हा जनतेला लुबाडून कमावलेल्या पैशाचा माज असून, हे अतिशय दुर्दैवी आहे.”










