धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून जिल्ह्यातील अत्यंत गंभीर आणि तातडीच्या विषयाकडे आपले लक्ष वेधले आहे. दरम्यान, यापूर्वी देखील ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून ड्रग्ज रॅकेटवर झालेल्या कारवाईमध्ये केवळ दिखावा करण्यात आला असल्याचे म्हटले होते. मात्र, यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात खासदार निंबाळकर यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत.
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?
तुळजापूर शहरात वाढलेल्या ड्रग्ज रॅकेटवर झालेल्या कारवाईमध्ये केवळ दिखावा करण्यात आला असून, या रॅकेटचे मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट आहेत. अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाला असून, ते पुन्हा समाजात वावरत आहेत. चिंतेची बाब म्हणजे, राज्याचे एक जबाबदार मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, यांनी जामिनावर सुटलेल्या अशाच एका आरोपीचा जाहीर सत्कार करून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. सरकारच्या या कृतीमुळे जनतेत आणि लोकप्रतिनिधींमध्ये अत्यंत चुकीचा संदेश जात असल्याचं खासदार निंबाळकर यांनी म्हटलं आहे.
आमदार कैलास पाटील यांनी वेळोवेळी आपली भेट घेऊन निःपक्षपाती कारवाईची मागणी केली होती – निंबाळकर
दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटलं आहे की, मी स्वतः लोकसभेत, तर आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत हा विषय लावून धरला. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली दिसत नाही. याउलट, ज्या पोलीस उपअधीक्षक (श्री. निलेश देशमुख) यांच्या कार्यकाळात तुळजापुरात ड्रग्जचा सुळसुळाट झाला, त्यांची बदली करण्याऐवजी त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या अधिकाऱ्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह आहे, त्यालाच बक्षीस देणे हे सरकारच्या धोरणांवर शंका निर्माण करते. याच अधिकाऱ्याकडे प्रकरणाचा तपास ठेवणे म्हणजे ‘लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण देण्यासारखे’ आहे असं ओमराजे निंबाळकर म्हणाले.
ओमराजे निंबाळकर यांनी पत्रात या प्रमुख मागण्या केल्या आहेत
१. ड्रग्ज रॅकेटमधील सर्व मुख्य आणि मोकाट आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्का (MCOCA) अंतर्गत कठोर कारवाई करावी.
२. जामिनावर सुटलेल्या आरोपीचा जाहीर सत्कार करणाऱ्या मंत्र्यांवर नैतिक जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी.
३. वादग्रस्त पोलीस उपअधीक्षक, श्री. निलेश देशमुख, यांना दिलेली एक वर्षाची मुदतवाढ त्वरित रद्द करून त्यांची तातडीने बदली करावी.
४. या संपूर्ण प्रकरणाचा तपास निःपक्षपातीपणे करण्यासाठी तो दुसऱ्या उच्चस्तरीय आणि स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवण्यात यावा.
आपण एक संवेदनशील नेते आहात. या निवेदनाचा कोणताही पक्षीय भेद न मानता, विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी, या मागण्या निंबाळकर यांनी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्या आहेत.










