कळंब (धाराशिव) – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कळंब तालुक्यातील इतकुर या गावाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष पाहिल्या. गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ठाकरे यांनी या दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा, नुकसानीचे प्रमाण आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या मदतीविषयी सविस्तर माहिती घेतली. शेतकऱ्यांना या कठीण प्रसंगात न्याय मिळवून देण्यासाठी आपण आवाज उठवू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
मी राजकारण करायला आलो नाही. पण तुमच्यावर अन्याय देखील होऊ देणार नाही. या संकटात फक्त शेती नाही तर शेतकऱ्यांचे आयुष्य वाहून गेले नाही. आमची मागणी आहे की, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. आम्हाला हेक्टरी ५० हजार रुपये मिळाले पाहिजे. सरकारने जी मदत केली आहे ती तुटपुंजी आहे. पिकविण्याचे निकष बदलले आहेत. आज माझ्या हातात काही नाही मी तुम्हाला धीर आणि विश्वास द्यायला आलो आहे. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
कृपा करून आत्महत्या करू नका हे वाईट दिवस जातील. खचून जाऊ नका. बँकेच्या वसुलीच्या नोटीस आल्या आहेत. या सर्व नोटीसा मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवून देऊ आणि त्यांना सांगू हे पैसे तुम्ही भरा. खचून जाऊ नका तुमच्या पाठीमागे तुमचा परिवार आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील , आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.










