धाराशिव | राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये मोठी संघटनात्मक हालचाल होत असून, धाराशिव जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आता प्रतापसिंह पाटील यांच्या खांद्यावर सोपवण्यात येणारं असल्याची माहिती अधिकृत माहिती मिळाली आहे. पक्षाला जिल्हा पातळीवर बळकटी देण्यासाठी आणि आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

पक्षाध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्षांच्या संमतीने ही नियुक्ती करण्यात येणार असून, जिल्ह्यातील पक्ष बांधणी, जनसंपर्क मोहीम तसेच गटातील अंतर्गत समन्वय वाढविण्याची जबाबदारी पाटील यांच्यावर सोपवण्यात येणारं असेल.
प्रतापसिंह पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाशी निष्ठेने कार्यरत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची धाराशिव जिल्ह्यातील पकड आणखी मजबूत होईल असा विश्वास वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या नियुक्तीबाबत मोठा उत्साह पाहायला मिळत असून, अनेकांनी सामाजिक माध्यमांद्वारे त्यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, शहरातील प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रतापसिंह पाटील यांनाच जिल्हाध्यक्ष पद देण्यात यावे, अशी ठाम मागणी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे केली होती. कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला होता की, “जर प्रतापसिंह पाटील यांना जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले नाही, तर आम्ही आमचा निर्णय येत्या दोन तारखेपर्यंत जाहीर करू.” त्यामुळे पक्षासमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं. अखेरीस, कार्यकर्त्यांच्या मागणीला मान देत पक्षश्रेष्ठींनी प्रतापसिंह पाटील यांच्या नावाचे पत्र तयार केल्याची अधिकृत माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता, ही नियुक्ती रणनीतीच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. पक्षाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन विस्तारासाठी विशेष मोहीम हाती घेणार असून, त्यातून धाराशिव जिल्ह्यात नवचैतन्य निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडींना सुरुवात होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.











