धाराशिव : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आपली पिकं नष्ट झाल्याने आत्महत्या केली आहे. जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीने हवालदिल झाला आहे. दरम्यान, घरातील सर्व साहित्य भिजल्याने नैराश्यग्रस्त झालेल्या एका वृद्ध महिलेने आत्महत्येचा प्रयत्न करत नदीत उडी मारल्याची धक्कादायक घटना सापनाई परिसरात घडली. पावसाने घरातील सर्व साहित्य भिजले. त्यामुळे, महिलेची खायची सुद्धा भ्रांत होऊ लागल्याने त्या नैराश्यात गेली आणि त्यांनी आत्महत्या करण्यासाठी नदीत उडी मारली मात्र, योग्य वेळी धाडस दाखवत एका तरुणाने त्यांचा जीव वाचवला. या थरारक घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, सदर घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
वृद्ध महिलेचा जीव वाचवण्यासाठी तरुणाने लावली जीवाची बाजी
दहिफळ येथील तेरणा नदीच्या पुलावरून भागुबाई वाघमारे (वय अंदाजे 65) या वृद्ध महिलेने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने नदीत उडी घेतली. त्याचवेळी तिथून जात असलेल्या स्कूल बस अमोल भातलवंडे यांनी महिलेने नदीत उडी मारल्याचे पहिले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता नदीत उडी घेऊन पोहत वृद्धेकडे गेला आणि त्यांचा जीव वाचवला. वृद्ध महिलेचा जीव वाचवण्यासाठी अमोलने जीवाची बाजी लावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वृद्ध महिलेची परिस्थिती बिकट
भागुबाई वाघमारे या विधवा असून त्यांना पती, मुलं कुणीही नाही. त्यामुळे सापनाई गावात त्या गेल्या ३५ वर्षांपासून एकट्याच वास्तव्याला आहेत. गावकऱ्यांनी त्यांना राहण्यासाठी तात्पुरता निवारा उपलब्ध करून दिला होता. मात्र, मुसळधार पावसामुळे या निवाऱ्यात पाणी शिरले आणि घरातील सर्व साहित्य भिजून गेले. या घटनेनंतर भागुबाई प्रचंड नैराश्यात गेल्या आणि आत्महत्येचा मार्ग निवडण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती स्थानिकांनी दिली. सध्या भागुबाई यांना सापनाई येथील रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गावकऱ्यांत संताप व प्रशासनाकडे मागणी
गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वृद्ध महिलेच्या निवाऱ्याची सोय करून देण्याची मागणी केली आहे. “एकाकी वृद्धांच्या समस्या समजून घेऊन शासनाने तत्काळ मदत केली पाहिजे, नाहीतर अशी प्रकरणे पुन्हा घडू शकतात,” असे गावकरी म्हणाले. तर, धाडसी अमोल भातलवंडे याच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. “अमोलसारखे धाडसी युवक समाजात आहेत म्हणूनच अजूनही मानवतेवर विश्वास आहे,” असे प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांचे म्हणणे आहे.











